गडचिरोलीत खळबळ! छत्तीसगडमधून होणारी १ कोटी २० लाखांच्या अंमली पदार्थांची तस्करी उघड; ८ तस्करांना बेड्या

0
1

गडचिरोली:

जिल्ह्याला हादरवून सोडणारी मोठी कारवाई करत गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगडमधून अवैधपणे अंमली पदार्थांची वाहतूक करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या ८ जणांच्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पेंढरी उपविभागांतर्गत गट्टा (फु) पोलीस पथकाने संयुक्तपणे ही धडक कारवाई केली असून, आरोपींकडून तब्बल २४०.५८० किलो ग्रॅम अंमली पदार्थासह एकूण १ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवैध कारवायांना आळा घालून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी कठोर निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पेंढरी उपविभागांतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा (फु) हद्दीत पोलीस अधिकारी व अंमलदार नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करत होते.

दरम्यान, पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाची (क्र. सी.जी. २६ के २१४९) तपासणी केली असता, त्यातील तीन इसम (अनिशकुमार पोंदी, हिमांशू नायक, परमब परिमलदास – सर्व रा. सुकमा, छत्तीसगड) उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. कसून चौकशी केली असता त्यांनी आपण अवैध अंमली पदार्थ वाहतुकीसाठी पायलटिंग करत असल्याचे कबूल केले. त्यांच्या पाठीमागे पिकअप वाहनातून त्यांचे इतर तीन साथीदार शंकर कोसा माडवी, भूपेश धनसुराम कोमरे, सुनील रामनाथ मंडावी – रा. सुकमा, छ.ग.अंमली पदार्थाची वाहतूक करून येत असल्याचे समोर आले. तसेच, काही अंतरावर निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी आलेले अमोल बळीराम दोरगे आणि विशाल गोवर्धन दोरगे (दोघे रा. पारोडी बोरोडी, ता. आष्टी, जि. बीड) हे देखील थांबल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल:

पोलिसांनी सर्व ८ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेल्या १२ चुंगळ्यांमधील अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी उपपोस्टे पेंढरी येथे १ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून, खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये अंमली पदार्थ: २४०.५८० किलोग्रॅम (किंमत ₹ १,२०,२९,०००/-),स्कॉर्पिओ वाहन: (क्र. सी.जी. २६ के २१४९) किंमत ₹ १०,००,०००/-,पिकअप वाहन: (क्र. सी.जी. २६ ई ५४७५) किंमत ₹ ८,००,०००/-,दुसरे चारचाकी वाहन: (क्र. सी.जी. ०४ एम.जी. ०७३०) किंमत ₹ ७,००,०००/-,मोबाईल संच: ०८ जुने मोबाईल (किंमत ₹ ८१,०००/-)

एकूण मुद्देमाल: ₹ १,४६,१०,०००/-

सर्व आठही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे करीत आहेत.

सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि कपिल आगलावे, पोमकेचे प्रभारी अधिकारी पोउपनि दयानंद भोंबे व पोलीस पथकातील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.