आल्लापल्ली येथील वनमजुरांचे साखळी उपोषण :माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतली आंदोलकांची भेट! या आधीही केली होती मुख्यमंत्री फडणवीस यांचे ओएसडी अनिरुद्ध पालकर यांच्या सोबत चर्चा.

0
1

जाणून घेतल्या वनमजुरांच्या व्यथा; दिवाळीच्या काळातही हक्काच्या वेतनासाठी आंदोलन सुरू, अद्याप तोडगा नाही

अहेरी:

आलापल्ली येथे प्रलंबित वेतनाच्या मागणीसाठी वनमजुरांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आज अकरावा दिवस असून, अद्यापही त्यांच्या मागण्यांवर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळातही आपल्या हक्काच्या मेहनताना आणि प्रलंबित वेतनासाठी वनमजुरांना आंदोलन करावे लागत असल्याने त्यांच्या परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित होत आहे.

दरम्यान, आज माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्या वनमजुरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जवळपास अर्धा ते एक तास आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या, प्रलंबित वेतनाचा प्रश्न आणि आंदोलनामागील भूमिका समजून घेतली.या आधी उपोषण सुरू करण्यापूर्वी वनमजुरांनी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव यांची भेट घेऊन निवेदन दिले होते त्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अनिरुद्ध पालकर यांच्याशी फोनवर चर्चा करून वनमजुरांचे प्रश्न सांगून परिस्थिती अवगत केली होती.

मागील अनेक महिन्यांपासून वनमजुरांचे वेतन प्रलंबित असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले असताना वारंवार मागणी करूनही वेतनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने वनमजुरांनी साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, उपोषणाला अकरा दिवस उलटूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी कायम आहे.

दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळातही आपल्या कष्टाचा मोबदला मिळवण्यासाठी वनमजुरांना उपोषणाला बसावे लागणे ही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरत आहे. त्यामुळे आता या प्रश्नावर प्रशासनाकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते आणि वनमजुरांना त्यांच्या हक्काचे प्रलंबित वेतन कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्यासह पदाधिकारी प्रशांत आईलवार, सामाजिक कार्यकर्ते किशोर धकाते , दीपक तोगरवार  अभिजीत शेंडे, सागर बिट्टीवार आदी.सोबत वनमजुरांची उपस्थिती होती.