आलापल्ली :
पाच तालुक्यांना जोडणारे प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या आलापल्ली बसस्थानकातील असुविधा, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मूलचेरा मार्गावरील अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थी व नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आलापल्ली येथील युवकांनी अहेरी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. येत्या १५ दिवसांत समस्यांचे निराकरण न झाल्यास पुन्हा आगारात येऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा युवकांनी दिला आहे.रात्री मुक्काम करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरआलापल्ली येथे बाहेरगावाहून येणाऱ्या अनेक प्रवाशांना रात्री उशिरा पोहोचल्यामुळे पुढील प्रवासासाठी बस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने त्यांना बसस्थानकावरच मुक्काम करावा लागतो. काही प्रवासी बसस्थानकात झोपून रात्र काढतात. अशा परिस्थितीत प्रवाशांचे पैसे व मोबाईल चोरीला गेल्याच्या घटनाही घडल्याचे सांगण्यात येत आहे. महिला प्रवाशांनाही रात्री बसस्थानकावर थांबावे लागते. त्यामुळे भविष्यात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिला व सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसस्थानकावर २४ तास सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.
स्वच्छतागृहाच्या पाइपलाइनला बिघाड; दुर्गंधी आणि डासांचा त्रासबसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणाच्या मागे स्वच्छतागृहाची पाइपलाइन फुटल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच ठिकाणी पंखे बंद अवस्थेत असून, रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरातील विद्युत दिवेही बंद असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था असलेले बेंचेसही तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे संबंधित समस्यांची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छता व मूलभूत सुविधा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
१०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी एकच बस; शैक्षणिक नुकसान कोण रोखणार?आलापल्ली ते मूलचेरा मार्गावरील बससेवेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर मूलचेरा मार्गाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १०० हून अधिक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच बस सोडली जात असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
विद्यार्थ्यांना वेळेत घरी पोहोचता यावे, यासाठी शाळेची सुट्टीदेखील नेहमीपेक्षा एक तास आधी, म्हणजे दुपारी ४ वाजता करण्यात येते. तरीही बसअभावी विद्यार्थ्यांची समस्या कायम आहे. परिणामी विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा वेळ वाया जात असून त्यांच्या शैक्षणिक बाबींवरही परिणाम होत आहे.
युवकांच्या म्हणण्यानुसार, एकाच वेळी दोन बसेस सोडण्याबाबत विचारणा केली असता आगार व्यवस्थापकांकडून एकाच वेळी दोन बसेस सोडता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे १०० हून अधिक विद्यार्थ्यांची गैरसोय होत असताना त्यांच्या समस्येची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न युवकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन या मार्गावर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
१५ दिवसांची मुदत; अन्यथा कायदेशीर कार्यवाहीचा इशारा
आलापल्ली बसस्थानकातील सुरक्षा, स्वच्छता, बंद पंखे व दिवे, तुटलेले बेंचेस आणि मूलचेरा मार्गावरील अपुऱ्या बसफेऱ्या या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी स्थानिक युवकांनी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन सादर केले.
प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे येत्या १५ दिवसांत निराकरण करावे, अशी मागणी युवकांनी केली आहे. निर्धारित मुदतीत योग्य कार्यवाही न झाल्यास पुन्हा आगारात येऊन पुढील योग्य ती कायदेशीर पावले उचलण्यात येतील, असा इशाराही युवकांनी दिला आहे.आता अहेरी आगार प्रशासन या समस्यांची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि प्रवाशांसह विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे आलापल्लीकरांचे लक्ष लागले आहे.




