अहेरी :-
अहेरी येथील महिला व बाल रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनात भाजपा तालुकाध्यक्ष विकास तोडसाम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गावंडे यांची भेट घेतली. यावेळी रुग्णालयातील स्वच्छता, जन्मदाखले मिळण्यास होणारा विलंब, रुग्णवाहिकांचे अद्ययावतीकरण, रिक्त पदांची भरती आणि उपजिल्हा रुग्णालयातील बंद असलेली डायलिसिस सेवा यांसह विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भाजपा तालुकाध्यक्ष विकास तोडसाम यांनी केली. रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था सुधारावी, जन्मदाखले वेळेत उपलब्ध करून द्यावेत, रुग्णवाहिकांचे अद्ययावतीकरण करावे तसेच आवश्यक रिक्त पदे तातडीने भरावीत, असे विविध मुद्दे त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसमोर मांडले.
•डायलिसिस सेवा लवकर सुरू करण्याची मागणी
अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवेचा प्रश्नही या भेटीदरम्यान प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. डायलिसिससाठी रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित समस्या तातडीने दूर करून ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी विकास तोडसाम यांनी केली.
यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गावंडे यांनी डायलिसिस सेवेच्या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असल्याचे सांगितले. या संदर्भातील अडचणी लवकरच दूर होतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे अहेरी परिसरातील डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, महिला व बाल रुग्णालयातील समस्यांबाबत चर्चा करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गावंडे यांनी रुग्णालयातील प्रश्न गंभीर असून शासन त्याकडे प्राधान्याने लक्ष देत असल्याचे स्पष्ट केले. विविध समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच सप्टेंबर महिन्यात रुग्णालयात आठ डॉक्टर रुजू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
अहेरी परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, रुग्णालयांमधील सुविधांमध्ये सुधारणा व्हावी आणि रुग्णांना उपचारांसाठी होणारा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने ही भेट घेण्यात आली. रुग्णालयातील प्रलंबित प्रश्न आणि डायलिसिस सेवेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कुमरे, सहाय्यक अधीक्षक बालराजू नरहरी, रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, भाजपा जिल्हा सचिव अभिजित शेंडे, अंकुश शेंडे, राहुल मटामी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.




