गडचिरोली :
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची नावे जुळलेली नाहीत किंवा ज्यांच्या माहितीत तार्किक विसंगती आढळल्यामुळे नोटिसा मिळाल्या आहेत, अशा मतदारांना भारत निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. आता या मतदारांना सुनावणीसाठी सरकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज उरलेली नाही. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्वतः मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या २६ आणि २९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या नवीन निर्देशानुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे.
व्हॉट्सॲपवरही पाठवता येणार पुरावे
सुधारित प्रक्रियेनुसार, नोटीस प्राप्त मतदार आपल्या बीएलओकडे व्हॉट्सॲपद्वारेही आवश्यक कागदपत्रे पाठवू शकतात. ज्या प्रकरणात तार्किक विसंगती आहे, तेथे केवळ त्याच विसंगतीशी संबंधित पुरावे स्वीकारले जातील. बीएलओचा पडताळणी अहवाल आणि पंचनाम्याच्या आधारे मतदार नोंदणी अधिकारी पुढील निर्णय घेतील.
अपवादात्मक परिस्थितीतच ऑनलाइन सुनावणी
कागदपत्रे उपलब्ध नसतील किंवा सादर केलेल्या पुराव्यांवरून निर्णय घेणे कठीण असेल, अशाच अपवादात्मक प्रकरणात ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतली जाईल. या सुनावणीला मतदार स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतीही सज्ञान (प्रौढ) व्यक्ती उपस्थित राहू शकते.
मतदार नोंदणीसाठी मतदान केंद्रांवर १० व ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तेथेही नोटीस प्राप्त मतदार आपली कागदपत्रे जमा करू शकतात.
असुरक्षित घटकांसाठी विशेष मदत कक्ष:
बेघर, कामगार, गरीब, अनाथ तसेच विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांतील (PVTG) पात्र व्यक्ती मतदार नोंदणीपासून वंचित राहू नयेत, यासाठी विशेष मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बीएलओ हे राजकीय पक्षांच्या बीएलएकडे (BLO/BLA) समन्वय ठेवून मतदारांशी संपर्क साधतील.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन: “नागरिकांनी कागदपत्रे स्वीकारण्यासाठी घरी येणाऱ्या बीएलओंना पूर्ण सहकार्य करावे, जेणेकरून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही.” — अविश्यांत पंडा (जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली)




