गडचिरोली:
बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य जपत दुर्गम भागातील नागरिकांची जीवनवाहिनी ठरलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सध्या काही कर्मचाऱ्यांच्या बेलगाम आणि मुजोर वागणुकीमुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अहेरी आगारातील गडचिरोली–भंडारा या महत्त्वाच्या मार्गावर कार्यरत असलेले वाहक सुरज गायकवाड यांनी प्रवाशांशी अत्यंत असभ्य वर्तन करत, “तुम्ही माझं काय वाकडं करणार? तक्रार कुठेही करा, मी कोणाला घाबरत नाही!” असा थेट दम भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्तव्यावर असताना प्रवाशांचे बेकायदेशीर मोबाईल चित्रीकरण करून आचारसंहिता, मोटर वाहन कायदा आणि ग्राहक हक्कांचे उघड उल्लंघन करणाऱ्या या वाहकावर तत्काळ कठोर कारवाई करण्याची तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.
गडचिरोली-भंडारा मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाहक सुरज गायकवाड हे तिकीट वितरण अथवा संवादादरम्यान नियमितपणे आक्रमक आणि तुच्छतेची भाषा वापरतात. रोजचे नोकरदार, उपचारासाठी जाणारे रुग्ण, वृद्ध, महिला आणि विद्यार्थी बसमधून प्रवास करतात. आपल्या नियोजित स्थळी वेळेत पोहोचणे हे उद्दिष्ट असल्याने प्रवासी वाद टाळतात. मात्र, प्रवाशांच्या याच सहनशीलतेला हतबलता समजून संबंधित वाहकाने अरेरावीची परिसीमा गाठल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
वाद सुरू असताना संबंधित वाहकाने स्वतःच्या वैयक्तिक मोबाईलवर प्रवाशांचे चित्रीकरण सुरू केले. महामंडळाच्या गणवेशात आणि कर्तव्यावर असताना प्रवाशांवर दबाव आणण्याच्या हेतूने असा व्हिडिओ काढणे हा प्रवाशांच्या वैयक्तिक गोपनीयतेवर थेट घाला आहे.
ऑगस्ट २०२६ मध्ये एसटी महामंडळाने जारी केलेल्या कडक परिपत्रकानुसार, कर्तव्यावर असताना चालक व वाहक यांनी रील, व्हिडिओ किंवा सोशल मीडियासाठी चित्रीकरण करण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. सेवाशिस्तीचा हा गंभीर भंग मानला जात असताना, संबंधित वाहकाने महामंडळाचे नियम पायदळी तुडवत प्रवाशांचे चित्रीकरण नेमके कोणत्या अधिकारात केले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तत्काळ निलंबन करून चौकशीची मागणी
अहेरी आगारातील या प्रकाराबाबत एका जागरूक प्रवाशाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित वाहक सुरज गायकवाड यांच्यावर यापूर्वीही अशा प्रकारच्या तक्रारी झाल्याचे सूत्रांकडून समजते. या प्रकरणीवाहकावर सेवा-नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावीवादग्रस्त प्रसंगी काढलेल्या मोबाईल व्हिडिओची प्रशासकीय चौकशी व्हावी,अहेरी आगार व्यवस्थापनाने वस्तुनिष्ठ अहवाल विभागीय नियंत्रकांकडे सादर करावा,एसटी महामंडळ प्रवाशांच्या खिशातून चालते, कोणाच्या वैयक्तिक मक्तेदारीवर नाही. त्यामुळे ‘तक्रार कुठेही करा’ असे उघड आव्हान देणाऱ्या अशा कर्मचाऱ्यावर आगार प्रशासन काय पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




