मूलचेरा,गडचिरोली :
‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा जिवंत प्रत्यय मुलचेरा तालुक्यातील ठाकूरनगरच्या जंगलात पाहायला मिळाला. अंगावर आलेला साक्षात काळ, थेट चेहऱ्यावर बसलेला वाघाचा तीक्ष्ण पंजा अन् डोळ्यांसमोर उभा ठाकलेला मृत्यू… अशा अत्यंत धडकी भरवणाऱ्या प्रसंगातही अढळ धैर्य दाखवत एका गुराख्याने हातातील साध्या काठीच्या जोरावर नरभक्षक वाघाला पळवून लावले. गणेश खितीस दास असे या धाडसी गुराख्याचे नाव असून, रक्ताळलेल्या अवस्थेतही त्यांनी दिलेल्या या थरारक लढाऊ बाण्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.
गुरुवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास गणेश दास हे मुलचेरा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५२१ (वन विकास महामंडळ क्षेत्र) मध्ये आपली गुरे चारत होते. जंगल अत्यंत दाट असल्याने झुडपांमध्ये दबा धरून बसलेला वाघ गणेश यांच्या दृष्टीस पडला नाही. अचानक वाघाने झेप घेत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.
चेहऱ्यावर वार, पण हार मानली नाही!
वाघाने थेट चेहऱ्यावर पंजा मारल्याने गणेश दास रक्ताळले. मात्र, अशा अत्यंत बिकट परिस्थितीतही त्यांनी धीर सोडला नाही. स्वतःच्या जीवावर बेतलेले असतानाही त्यांनी हातातील काठीने वाघाचा प्रतिकार केला. झाडाचा आसरा घेत रक्ताळलेल्या अवस्थेतही त्यांनी दिलेला हा लढा पाहून अखेर वाघाने माघार घेतली आणि तो जंगलात पळून गेला.
झाडाच्या आसऱ्याने अन् काठीच्या प्रतिकाराने गणेश दास मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर पडले असले, तरी या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गणेश यांच्या या अचाट धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यानंतर त्याने झाडावर चढून रक्तबंबाळ अवस्थेत मोबाईल काढून गावातील परिचयाच्या व्यक्तींना घडलेली हकिकत सांगितली.त्यानंतर ही वार्ता
गावात वाऱ्यासारखी पसरताच गावकरी आणि वन विभागाची कुमक जंगलाकडे धावली.
वन विकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ( गंजीवाड आणि वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश्वर वाडीघरे यांनी पथकासह घटनास्थळ गाठून गणेश यांना झाडावरून सुरक्षित खाली उतरवले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना तातडीने चामोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, गणेश यांच्या ओठावर, गालावर आणि शरीरावर नख्यांचे गंभीर ओरखडे व जखमा झाल्या आहेत; मात्र योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे.
जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाने पुन्हा एकदा अत्यंत भीषण रूप धारण केले आहे. गुरुवारी सकाळीच गडचिरोली तालुक्यातील वसा शेतशिवारात मशरूम आणण्यासाठी गेलेल्या बाळू विठ्ठल राऊत (वय ४५) या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात झालेला मृतदेह आढळून आला होता. ही घटना ताजी असतानाच काही तासांत मुलचेरा भागात गणेश दास यांच्यावर हल्ला झाला. एकाच दिवशी दोन हल्ले झाल्याने जंगलालगतच्या खेड्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी शेती आणि गुरे घेऊन जंगलात जाने ही सीमावर्ती भागातील नागरिकांची रोजची अपरिहार्यता आहे. वन विभाग केवळ ‘सतर्क राहा’ अशा घोषणा, बॅनरबाजी करतात आणि मोकळे होतात; मात्र प्रत्यक्षात संवेदनशील भागात पायदळ गस्त वाढवणे, आधुनिक कॅमेरा ट्रॅप्सद्वारे वाघांच्या हालचाली टिपणे आणि हिंस्त्र श्वापदांचा वेळीच बंदोबस्त करणे यात यंत्रणा तोकडी पडत असल्याची संतप्त भावना परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे…




