अहेरी:
कमांडंट शंभू कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ०९ व्या बटालियनमध्ये सीआरपीएफचा (CRPF) ८८ वा स्थापना दिवस २७ जुलै २०२६ रोजी अतिशय उत्साहात आणि दिमाखात अहेरी प्राणहिता उपमुख्यालयात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या परेडने झाली, ज्यामध्ये दलाच्या वीर शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परेडदरम्यान उपस्थित अधिकारी व जवानांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर शहिदांना नमन करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प केला.
संध्याकाळी बटालियनच्या आवारात एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सीआरपीएफचे अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी उत्साहाने भाग घेतला. या कार्यक्रमात देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या सांस्कृतिक सादरीकरण, गीते, नृत्य आणि इतर मनमोहक कार्यक्रमांनी उपस्थितांची मन जिंकून घेतली. या प्रसंगी कौटुंबिक सलोखा, परस्पर सहकार्य आणि दलाच्या गौरवशाली परंपरांची सुंदर झलक पाहायला मिळाली. सर्व सहभागींना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी कमांडंट श्री शंभू कुमार यांनी उपस्थित सर्व अधिकारी, जवान व त्यांच्या कुटुंबीयांना संबोधित करताना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ८८ व्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सीआरपीएफचा गौरवशाली इतिहास, शौर्य, शिस्त आणि राष्ट्रसेवेच्या उत्कृष्ट परंपरेचा उल्लेख करत सर्व कर्मचाऱ्यांना याच समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेने निरंतर देशसेवेत योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, जवान आणि कुटुंबीयांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.
हा सोहळा पूर्ण उत्साह, शिस्त आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेने पार पडला तसेच उपस्थितांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.




