आलापल्ली (विशेष प्रतिनिधी):
आलापल्ली येथील वीर बाबुराव सेडमाके मुख्य चौकात आज केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत जोरदार निदर्शने करण्यात आली. वाढता असंतोष आणि विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी एकत्र येत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनानंतर पोलीस प्रशासनामार्फत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
आलापल्ली येथील चौकात आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित झाले होते. केंद्र सरकारच्या शैक्षणिक आणि इतर धोरणांमुळे विद्यार्थ्यांचे तसेच सामान्य जनतेचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. दिल्ली येथील विद्यार्थ्यावर झालेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध करण्यात आला . काही काळ ठाण मांडून निदर्शकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला. यावेळी आंदोलन कर्त्यांनी मुख्य चौक ते ग्रामपंचायत पर्यत रॅली काढून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
पोलीस प्रशासनाला सुपूर्द केले निवेदन
चौकातील निदर्शनांनंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी / ठाणेदारांमार्फत केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यासाठी एक औपचारिक निवेदन सुपूर्द करण्यात आले. या निवेदनात शिक्षण क्षेत्रातील गोंधळ आणि धोरणात्मक अपयशाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा द्यावा, ही मुख्य मागणी अधोरेखित करण्यात आली आहे.
“शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चाललेला खेळ आता सहन केला जाणार नाही. केंद्र सरकारने तात्काळ योग्य पावले न उचलल्यास आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा न घेतल्यास येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला.
या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आलापल्ली चौकात स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने पार पडले.




