अहेरी नगरपंचायत पोटनिवडणूक: भाजपच्या गडात ‘तुतारी’चा आवाज बुलंद; ‘घड्याळा’ने रान मोकळे केले की काँग्रेस-आविसची कोंडी?

0
7
Oplus_16908288

मिलिंद खोंड

अहेरी:

अहेरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. ९ साठी झालेल्या पोटनिवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि रंजक लढत पाहायला मिळाली. या प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवाराने ‘तुतारी’ चिन्हावर विजयी झेंडा फडकवला आहे.हा प्रभाग अहेरी इस्टेटचे राजे आणि गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव महाराज यांचा म्हणजेच भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. भाजपच्या या गढात ‘तुतारी’ने मिळवलेला विजय स्थानिक राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. जरी या निकालामुळे नगरपंचायतीच्या सध्याच्या सत्ता-समीकरणावर मोठा फरक पडणार नसला, तरी आगामी काळातील मोठ्या राजकीय फेरबदलांचे संकेत मात्र यातून नक्कीच मिळत आहेत.

सहानुभूतीची लाट अपयशी, भाजपला निसटता पराभव

भाजपाच्या तत्कालीन नगरसेविका सुनीता मंथनवार यांच्या अकाली निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला या जागेवर सहानुभूतीची लाट निर्माण करता येईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, मतदारांनी वेगळा कौल दिल्यामुळे भाजपला या हक्काच्या जागेवर निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला.

‘घड्याळा’ने साधले योग्य टायमिंग? ‘सेफ गेम’ची चर्चा

या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा रंगली ती विद्यमान अहेरी विधानसभेचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाची). अजित पवार गटाने या ठिकाणी थेट उमेदवार न उतरवता एक प्रकारे “सेफ गेम” खेळल्याचे दिसून आले. राजनगरी अहेरीमध्ये एका एका जागेसाठी काटे की टक्कर होत असताना, येथे ‘तुतारी’चा आवाज बुलंद व्हावा यासाठी ‘घड्याळा’नेच योग्य टायमिंग साधून मार्ग मोकळा करून दिला की काय? अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काँग्रेस आणि ‘आविस’ बॅकफूटवर; शुक्लकाष्ठाची भीती?

दुसरीकडे, महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि स्थानिक पातळीवर मजबूत असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघाने (आविस) या पोटनिवडणुकीत अजिबात रस दाखवला नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्या सर्वोच्च नेत्यांच्या पाठीमागे लागलेले कायदेशीर किंवा राजकीय ‘शुक्लकाष्ठ’ संपता संपेना, म्हणूनच उमेदवार देण्यापर्यंतची हिंमत या पक्षांना दाखवता आली नाही का? हे अहेरीच्या जनतेसाठी मोठे कोडे बनले आहे.

राजपरिवाराचे राजकारण आणि आगामी पेच

एकंदरीत या निकालाने अनेक अनुत्तरित प्रश्न सोडून दिले आहेत. आगामी काळात ‘तुतारी’ला बळ देण्यासाठी ‘घड्याळ’ जाणीवपूर्वक रान मोकळे करत आहे काय? की अहेरी राजपरिवारातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा कोणत्या तरी वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचेल? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच स्पष्ट होतील.