*अहेरी :-* प्रभाग क्रमांक ०२ मधील बेघर कॉलनी (इंदिरा नगर) येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या समस्येला अखेर दिलासा मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते *सचिन येरोजवार* यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे येथील रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बेघर कॉलनी परिसरातील रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता. पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि नाल्यांच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास, ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करण्यास तसेच दैनंदिन कामकाजासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या समस्येची गांभीर्याने दखल घेत सामाजिक कार्यकर्ते सचिन येरोजवार यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने सादर करून रस्ता बांधकामाची मागणी लावून धरली. तसेच स्थानिक नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला.
अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून बेघर कॉलनीतील रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. नव्याने तयार झालेल्या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतुकीची सुविधा सुधारली आहे.
याबद्दल परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन येरोजवार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. नागरिकांच्या मूलभूत समस्यांच्या निराकरणासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.




