गडचिरोली:14 मे
महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या हाकेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज दि. १४ मे २०२६ पासून राज्यव्यापी आंदोलनास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथेही गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वामध्ये आंदोलनाचा पहिला टप्पा राबविण्यात आला.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी परीक्षा भवन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्रित आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध नोंदविला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी नियमित कामकाज सुरू ठेवून आंदोलनाला प्रतीकात्मक स्वरूप दिले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आंदोलनाच्या पार्श्वभूमीची माहिती देत पुढील टप्प्यांबाबत मार्गदर्शन केले. शासनाकडून वारंवार आश्वासने देऊनही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्यायोचित मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संयुक्त कृती समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार १०, २० व ३० वर्षांनंतर आश्वासित प्रगती योजना लागू करणे, उर्वरित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त शिक्षकेतर पदभरतीस मंजुरी देणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित लाभ मंजूर करणे, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे तसेच DCPS वर्गणी कपात पूर्ववत सुरू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. पुढील टप्प्यांमध्ये धरणे आंदोलन, लेखणी बंद आंदोलन, कामबंद आंदोलन तसेच आवश्यक असल्यास बेमुदत संपही पुकारण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला.
गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष महादेव वासेकर यांनी शासनाने वेळेत निर्णय घेतल्यास आंदोलन टाळता येऊ शकते, असे मत व्यक्त केले. तसेच संघटनेचे सचिव सतीश पडोळे यांनी शासन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याची टीका करत ८ जूनपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल व विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज तसेच उन्हाळी परीक्षा प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने कर्मचाऱ्यांचा रोष शासनापर्यंत पोहचवावा व सकारात्मक निर्णय घेण्यास बाध्य करावे जेणेकरून कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. असे मत व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष महादेव वासेकर, सचिव सतीश पडोळे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.




