अहेरीचे भूमिपुत्र ‘सेन्साई’ रवी भांदककार यांना दिल्लीत आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट बहाल मार्शल आर्टमधील उल्लेखनीय कार्याचा गौरव; अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून सन्मान

0
3

अहेरी :

अहेरीचे सुपुत्र, जागतिक मास्टर्स कराटे विजेते आणि नगर पंचायत अहेरीचे ब्रँड ॲम्बेसडर मास्टर सेन्साई रवी भांदककार यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मार्शल आर्ट आणि फिजिओथेरपी या क्षेत्रात गेल्या सात वर्षांपासून त्यांनी केलेल्या संशोधनात्मक कार्याची दखल घेत, युनायटेड अमेरिकन युनिव्हर्सिटी द्वारे त्यांना ‘आंतरराष्ट्रीय मानद पदवी’ (Doctorate) देऊन दिल्ली येथे गौरविण्यात आले.

दिग्गजांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा

२५ मार्च २०२६ रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय विद्यापीठ दीक्षांत समारंभात’ हा सोहळा पार पडला. यावेळी ३० देशांतील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या १०७ महानुभावांचा सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर युनायटेड अमेरिकन युनिव्हर्सिटीचे डिन न्यायाधीश डॉ. के. व्यंकटेशन, मुख्य अतिथी मथुरा क्षेत्राचे खासदार राजा मनवेन्द्र सिंह, श्रीलंकेच्या इस्टर्न विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रोफेसर वल्लीपुरम कनागासिंगम, भारत स्काऊट अँड गाईडचे राष्ट्रीय आयुक्त डॉ. के. सुकुमारा, यु.ए.ई.चे देश निर्देशक डॉ. विल्लाट कोरीये यांसह ३५ देशांतील कुलगुरू व मार्शल आर्ट ग्रँडमास्टर्स उपस्थित होते.

जागतिक रेकॉर्डसाठी मिळणार ‘अमेरिकन’ बळ

येत्या १६ ऑगस्ट २०२६ रोजी चेन्नई (तमिळनाडू) येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड जीनियस रेकॉर्ड’साठी रवी भांदककार सज्ज झाले आहेत. त्यांच्या या जागतिक विक्रमाच्या तयारीसाठी आणि थीसिस संकलनासाठी युनायटेड अमेरिकन युनिव्हर्सिटी आर्थिक प्रायोजकत्व (Sponsorship) देणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. के. व्यंकटेशन यांनी यावेळी केली. अहेरीसारख्या ग्रामीण भागातील सुपुत्राला ही संधी मिळणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

हा सन्मान अहेरी नगरीचा: डॉ. रवी भांदककारआपल्या भावना व्यक्त करताना डॉ. रवी भांदककार म्हणाले की, “हा सन्मान माझा एकट्याचा नसून संपूर्ण अहेरी राज नगरीचा आहे. माझ्या यशात पत्नी सौ. किरण भांदककार यांचे सहकार्य आणि मार्गदर्शक गुरु विनोद भोसले सर, ग्रँडमास्टर मोसेस तिलक सर, डॉ. शिवकुमार रामलिंगम व अरविंद पाटील सर यांचा मोलाचा वाटा आहे.”यावेळी त्यांना २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय तायकांडो कोरिया’ची ब्लॅक बेल्ट डॅन पदवी आणि प्रमाणपत्र देऊनही सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल अहेरीसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.