वांगेपली येथे सिकलसेल अ‍ॅनिमिया (अरुणोदय) अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

0
1

अहेरी:16जानेवारी 2025

द-गोटूल वृत्तसेवा

वांगेपली येथे VHSND कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने गावात सिकलसेल अ‍ॅनिमिया (अरुणोदय) अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. सदर अभियान मा. श्री. दिलीप मडावी (सरपंच) व मा. डॉ. लुबना हकीम (वैद्यकीय अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या अभियानाचा मुख्य उद्देश सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करणे व वेळेवर तपासणी करून रुग्णांना योग्य उपचार मिळवून देणे हा होता. यासाठी गावात रॅली काढण्यात येऊन नागरिकांना सिकलसेल आजाराची लक्षणे, प्रतिबंध व उपचार याबाबत माहिती देण्यात आली. रॅलीदरम्यान गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी मा. सरपंच दिलीप मडावी यांनी स्थानिक भाषेत मार्गदर्शन करत सिकलसेल आजाराबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच मा. डॉ. लुबना हकीम यांनी सिकलसेल अ‍ॅनिमिया हा अनुवंशिक आजार असून वेळीच निदान व उपचार केल्यास रुग्णांचे जीवनमान सुधारू शकते, अशी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

या अभियानात MMU टीम, CHO, आरोग्य सहाय्यक, ANM, आशा कार्यकर्ती व गट प्रवर्तक यांच्या सहकार्याने सिकलसेल पात्र लाभार्थ्यांची सोल्यूबिलिटी तपासणी करण्यात आली. तपासणीत दोन रुग्ण संशयित आढळून आले असून त्यांना पुढील तपासणीसाठी SDH (उपजिल्हा रुग्णालय) येथे पाठविण्यात येत आहे.

सदर सिकलसेल अ‍ॅनिमिया अभियानाला वांगेपली ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे ग्रामीण भागात आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.