अहेरी (गडचिरोली):19जानेवारी
रविवार दुपारपासून बेपत्ता असलेल्या नागेपल्ली येथील एका इसमाचा सोमवारी सकाळी जंगल परिसरात अत्यंत विदारक अवस्थेत मृतदेह आढळून आला. रवींद्र तंगडपल्लीवार (४९, रा. नागेपल्ली) असे मृताचे नाव असून, त्यांच्या शरीरावरील जखमांचे स्वरूप पाहता त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहेरी तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
रवींद्र तंगडपल्लीवार हे आर.डी. (RD) जमा करण्याचे काम करायचे. रविवार, १८ जानेवारी रोजी दुपारी ‘कामानिमित्त प्रगती बँकेत जातो’ असे सांगून ते घराबाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला. सायंकाळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीय आणि मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला, परंतु त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही.
जंगलात आढळला मृतदेह
सोमवारी सकाळी आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर (NH-353C) पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. दरम्यान, आलापल्लीपासून ५ किमी अंतरावर असलेल्या नागमंदिराजवळील जंगलात, महामार्गापासून साधारण २०० मीटर आत तंगडपल्लीवार यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेचा पंचनामा केला असता, ही हत्या अत्यंत क्रूरपणे केल्याचे समोर आले आहे.तीक्ष्ण हत्याराचा वापर करून डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आले आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्या हाताचे एक बोट पूर्णपणे छाटले आहे.मृतदेहाजवळ दोन ग्लास आणि दारूची एक छोटी बाटली पोलिसांना सापडली आहे. यावरून ओळखीच्याच व्यक्तींनी दारू पाजून किंवा दारू पिण्याच्या बहाण्याने नेऊन ही हत्या केली असावी, असा संशय बळावला आहे.
पोलिस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे आणि पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अहेरी पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत असून हत्येचे नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. एका कमावत्या व्यक्तीची अशा प्रकारे हत्या झाल्याने तंगडपल्लीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



