एटापल्ली ते मरपल्ली रस्त्यावर नियमबाह्य विद्युत खांब उभारणी; विद्युत विभागाच्या दुर्लक्षावर नागरिकांची नाराजी*

0
47

एटापल्ली*

एटापल्ली पासून काही अंतरावर असलेल्या मरपल्ली रस्त्यावर काही खाजगी कामाकरिता विद्युत विभागाची कोणतीही रीतसर परवानगी न घेता विद्युत खांब उभारण्यात आले असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. हे खांब उभारले जाऊन जवळपास 10 दिवसांचा कालावधी लोटला आहे. तथापि, या प्रकरणाबद्दल संबंधित विद्युत विभागाला कोणतीच माहिती नसल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणामुळे प्रशासनातील बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मरपल्ली रस्त्यावर काही खाजगी कामाकरिता उभारण्यात आलेले हे विद्युत खांब संबंधित विद्युत विभागाच्या परवानगीविना उभारले गेल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नियमांचे उल्लंघन करून उभारलेले हे खांब सध्या वादाचा विषय बनले आहेत.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, हे खांब उभारताना विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे अनभिज्ञ राहिले का, हे समजणे कठीण आहे. जवळपास दहा दिवसांपासून हे खांब उभे असून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

प्रकरणात विशेषतः प्रश्न असा उपस्थित होतो की, जेव्हा हे खांब उभारले जात होते, तेव्हा संबंधित कर्मचारी आणि अधिकारी काय करीत होते? विद्युत विभागाचे नियमित निरीक्षण आणि देखरेख नसल्यामुळेच हे नियमबाह्य काम उघडपणे पार पडले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“एखाद्या खाजगी कामाकरिता विद्युत खांब उभारण्यासाठी रीतसर परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, येथे नियमांचे उल्लंघन होत असताना प्रशासन गप्प का राहिले?” असा सवाल एका स्थानिक नागरिकाने केला.

विद्युत खांब उभारण्यासाठी संबंधित विभागाकडून परवानगी घेणे अनिवार्य आहे. अशा प्रकारे परवानगी न घेता काम केल्यास ते नियमबाह्य ठरते. विद्युत विभागाच्या नियमांनुसार, कोणत्याही खाजगी कामासाठी विद्युत खांब उभारण्याआधी आवश्यक तांत्रिक परिक्षण आणि सुरक्षा प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असते. परंतु, या प्रकरणात हे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले आहेत

सदर प्रकरणाची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित विभागाने घटनास्थळी जाऊन तपास करावा आणि परवानगीविना उभारलेल्या खांबांचा उपयोग कशासाठी होणार आहे हे तपासून पाहावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नियमांचे उल्लंघन करून खांब उभारण्यात येणे हे गंभीर आहे आणि यावर तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.

 

_“आमच्या विभागाला या नियमबाह्य खांब उभारणीबाबत कोणतीही माहिती नव्हती. ही बाब गंभीर असून यासंदर्भात चौकशी केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.”_

*-प्रवीण कुमार जंगले उपकार्यकारी अभियंता,विज वितरण कंपनी,एटापल्ली*