आलापल्ली–मुलचेरा मार्गाची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची शिवसेनेची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

0
3

अहेरी. ६ ऑगस्ट २०२६ :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गडचिरोली जिल्हाप्रमुख दिलीपभाऊ सुरपाम यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली उपविभागाचे कार्यकारी अभियंता यांना आलापल्ली–मुलचेरा या प्रमुख मार्गाच्या अतिशय खराब अवस्थेबाबत निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आलापल्ली–मुलचेरा हा मार्ग हजारो नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार अपघात घडत असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या मार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवून रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने काम सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, सात दिवसांच्या आत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने जनतेसह तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची तसेच इतर सर्व परिणामांची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी निवेदन देतांना विधानसभा समन्वयक मिंटू सय्यद,अहेरी तालुका प्रमुख प्रफुल येरणे,मूलचेरा तालुका प्रमुख समर मुखर्जी,रवी कापलवार आल्लापल्ली शहर प्रमुख, सचिन सलामे

बाबुलदास,सुभाल मंडल आदी.ची उपस्थिती होती.