प्रवीण पहानपटे यांची महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या सचिव पदी निवड

0
48

गडचिरोली:
गोंडवाना विद्यापीठामध्ये महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा कालावधी पूर्ण झालेला असल्याने सदर सभेत नव्याने कार्यकारिणी गठित करण्याचा विषय सभेपुढे होता. सभेला राज्यभरातील विविध विद्यापीठांतील घटक संघटनांचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महासंघाच्या अध्यक्षपदी अजयभाऊ देशमुख, अमरावती विद्यापीठ व महासचिवपदी मिलिंद भोसले, कोल्हापूर विद्यापीठ यांची एकमताने बिनविरोध फेरनिवड झाली तसेच गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी प्रवीण पहानपटे यांची एकमताने सचिवपदी बिनविरोध निवड झाली.
श्री. पहानपटे हे गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे मागील 8 वर्षापासून सदस्य असून संघटनेच्या प्रत्येक चळवळीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या, मागण्या संघटनेपुढे मांडून त्यांच्या सोडवणूकिकरिता प्रयत्नरत राहणे हा त्यांच्या नित्याचाच भाग आहे.
श्री. पहानपटे यांच्या रूपाने महासंघाला युवा नेतृत्व लाभले असून त्यांच्यातील संघटन कौशल्याने महासंघ अधिक मजबूत झालेला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या समस्या, मागण्या राज्यपातळीवर मांडून त्या सोडविणे सहज व सुलभ होईल असे मत कर्मचारी संघटनेचे सचिव तथा अधिसभा सदस्य सतिश पडोळे यांनी व्यक्त केले.
महासंघ प्रतिनिधी म्हणून गोंडवाना विद्यापीठातील श्री. विजयकुमार कौशिक व श्री. विजय जाधव यांची निवड झालेली आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच का होईना परंतु महासंघाच्या महत्वाच्या पदावर राज्यनेतृत्वाची संधी मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांनी सदर निवडीबाबत महासंघ अध्यक्ष, महासचिव तसेच गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, उपाध्यक्ष महादेव वासेकर, सचिव व अधिसभा सदस्य सतिश पडोळे तसेच संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचे आभार व्यक्त केले.