अहेरी:
नागेपल्ली परिसरातील मदर तेरेसा नगरात राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने घरी कोणीही नसताना गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
या दुर्दैवी घटनेमुळे नागेपल्ली परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मृतक मुलगा इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत होता. सकाळी त्याचे आई-वडील प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते, त्यामुळे घरी एकटाच होता. याच दरम्यान, सकाळी सुमारे ८:३० वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरी गळफास लावून घेतला.काही वेळाने पालक चर्चमधून घरी परतले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला. आपल्या पोटच्या गोळ्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून पालकांनी एकच हंबरडा फोडला. त्यांच्या आक्रोशामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला, जिथे डॉक्टरांकडून शवविच्छेदन (Post-mortem) करण्यात आले. एका होतकरू मुलाच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी अहेरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मानसिक आरोग्य संदर्भात मदतीसाठी बाल हक्क हेल्पलाईन नंबर (उदा. चाइल्डलाईन १०९८ किंवा किरण हेल्पलाईन १८००-५९९-००१९) यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.




