आलापल्लीत वनमजुरांचे उपोषण आठव्या दिवशीही सुरू; ५-६ महिन्यांचे वेतन प्रलंबित! थंडी,अवकाळी पावसाची तमा न बाळगता मजुरांचा लढा;  आता ‘आर-पार’च्या तीव्र आंदोलनाचा इशारा.

0
1

अहेरी:

आलापल्ली उपवनसंरक्षक कार्यालयासमोर आपल्या प्रलंबित वेतनाच्या मागणीसाठी वनमजुरांचे साखळी उपोषण सलग आठव्या दिवशीही सुरूच आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या मजुरांनी आता ‘आर-पार’चे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

आलापल्ली वनविभागांतर्गत येणाऱ्या लाकूड डेपो, जंगल परिसर तसेच वाहतूक विपणन डेपोमध्ये शासकीय दरानुसार रोजंदारी व कंत्राटी पद्धतीने वनमजुरांची नेमणूक करण्यात आली होती. या मजुरांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून वनविभागाची सेवा केली आहे. मात्र, गट बांधणी व ओडवन मोजमापाचे गेले ५ ते ६ महिन्यांचे वेतन त्यांना अद्याप मिळालेले नाही. बल्लारशाह वाहतूक विपणनतर्फे लाकूड डेपो आलापल्ली येथे आणि मध्यवर्ती काष्ठ भांडार क्र. १ आलापल्ली येथे काम करणाऱ्या हंगामी व रोजंदारी मजुरांवर ही  वेळ ओढवली आहे.

प्रशासनाची उदासीनता आणि मजुरांचे हाल

वेतन न मिळाल्यामुळे मजुरांनी अनेकदा संबंधित वनाधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती केली; परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरे मिळाली. अखेर हवालदिल झालेल्या सर्व रोजंदारी वनमजुरांनी एकत्र येत लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग पत्करला. आंदोलनाला आठ दिवस लोटले तरी अद्याप प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. या कडाक्याच्या थंडीत आणि अवकाळी पावसाच्या संकटाचा सामना करत हे गरीब मजूर आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

मजुरांचा कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात

वनविभागात रोजंदारीवर काम करणारे हे मजूर अत्यंत गरीब असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मिळणाऱ्या मजुरीवरच अवलंबून आहे. पाच ते सहा महिने मजुरी न मिळाल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे प्रशासनाने मजुरांच्या या रास्त मागणीचा व त्यांच्या कष्टाचा विचार करून, कसलाही विलंब न करता सर्व मजुरांचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे, अशी मागणी जोर धरत आहे.