स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही चिरेपल्ली वासीयांची चिखलातून पायपीट! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ता मंजूर करण्याची मागणी.

0
1

अहेरी:

देशाने स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सव साजरा केला, तरीही अहेरी तालुक्यातील आलापल्ली ते चिरेपल्ली गावापर्यंतच्या रस्त्याचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांना आजही चिखलातून आणि पायवाटेने प्रवास करावा लागत असल्याची समस्या समोर आली आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबत या परिस्थितीमुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.

आलापल्ली ते चिरेपल्ली गावाला जोडणारा रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल आणि निसरड्या मार्गामुळे ये-जा करणे कठीण होते. विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्याअभावी ग्रामीण भागातील नागरिकांना शिक्षण, आरोग्यसेवा, शेतीविषयक कामे, बाजारपेठ आणि इतर शासकीय सुविधांपर्यंत पोहोचताना अडथळे निर्माण होतात. ग्रामीण विकासासाठी रस्ते ही मूलभूत गरज असताना या मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी पुढे आली आहे.

या पार्श्वभूमीवर आलापल्ली ते चिरेपल्ली गावापर्यंतचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करून निधी उपलब्ध करावा। अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे अहेरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी एकता मंच युवा नेते कैलाशभाऊ कोरेत यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करून रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी, आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण आणि प्रशासकीय कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही ग्रामीण भागातील नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत असेल, तर ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला अधिक गती देण्याची गरज अधोरेखित होते. संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन रस्त्याच्या मंजुरीसाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा अहेरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी एकता मंच युवा नेते कैलाशभाऊ कोरेत आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.अतिसंवेदनशील भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी निवेदकांना दिले……!