मिलिंद खोंड:अहेरी
ईतलचेरूच्या विद्यार्थिनीकडून ५००० रुपयांची देणगी
ईतलचेरू: शाळा ही गावाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाचा कणा असते, हे संस्कार जपत ईतलचेरू येथील एका चिमुकल्या विद्यार्थिनीने आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेला अमूल्य भेट दिली आहे.
ईतलचेरू येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते गुरुदास मडावी यांची ज्येष्ठ कन्या कु. चारवी मडावी, जी सध्या चंद्रभागा मद्दीवार, अहेरी येथील शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. १० डिसेंबर २०२५ रोजी तिच्या वाढदिवसानिमित्त, तिने अनेक वर्षांपासून आपल्या पिगी बँक (गुल्लक) मध्ये खाऊचे पैसे जमा केले होते. हे जमा झालेले ₹५००० रुपये तिने शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी दान केले.
प्रेरणादायी योगदान
चारवीच्या घरातून मिळालेल्या संस्कारांमुळे तिने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सध्या गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला विकसित आणि सक्षम करण्यासाठी अनेक सामाजिक हात मदतीला येत आहेत. यापूर्वी, मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या नीतू जोशी यांनी शाळेला दोन संगणक दिले होते. तसेच गाव सहयोग आणि ग्रामपंचायत खमंनचेरू यांच्याकडून ५५ इंच टीव्ही, कॉम्प्युटर लॅबसाठी खुर्च्या, वॉल फॅन आणि चार्जेबल साउंड सिस्टीमसारखी शैक्षणिक साधने पुरवण्यात आली आहेत.
या विकासकार्यात कु. चारवी गुरुदास मडावी हिने आपल्या खाऊचे पैसे रु. ५००० शाळेला देणगी स्वरूपात देऊन समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
शाळेत वाढदिवस साजरा
शाळेतच आपला वाढदिवस साजरा करून चारवीने ही रक्कम मुख्याध्यापक खुर्शीद शेख यांना सुपूर्द केली. चारवीच्या या निर्णयाचे मुख्याध्यापक, अध्यक्ष मधुकर मडावी व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच शिक्षक संजय कुमरे आणि अमित बंडावार यांनी विशेष कौतुक केले.
याप्रसंगी चारवीचे कुटुंबिय – आई सौ. कल्याणी गुरुदास मडावी, बहीण, मोठे वडील सतीश मडावी, आजोबा दादाजी मडावी, काका किशोर पेंदाम तसेच इतर सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे चारवी दरवर्षी आपला वाढदिवस शाळेतच साजरा करते. तिच्या या सामाजिक भावनेचे गावात सर्वत्र कौतुक केले जात आहे.




