संविधान दिनी २६ नोव्हेंबरला गोंडवाना विद्यापीठात १०० टक्के काम बंद आंदोलन! कर्मचारी व अधिकारी संघटनेचा सक्रिय सहभाग; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा.

0
1

गडचिरोली :

महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना व अधिकारी संघटना, गडचिरोली सक्रियपणे सहभागी होणार असून विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १०० टक्के सहभाग नोंदविण्याचा निर्धार केला आहे.

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात ५ नोव्हेंबर रोजी उच्च शिक्षण संचालनालय, पुणे येथे धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्याने १८ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. आता तिसऱ्या टप्प्यात २६ नोव्हेंबर रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आयोजित द्वारसभेत कर्मचारी संघटनेचे सचिव तथा अधिसभा सदस्य श्री. सतीश पडोळे आणि अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदेश सोनुले यांनी आंदोलनाची भूमिका व मागण्यांची माहिती देत कर्मचाऱ्यांना एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. मनोज जाधव, उपाध्यक्ष श्री. महादेव वासेकर, सहसचिव कु. शाहिना पठाण, कोषपाल श्री. प्रवीण बुराडे, कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री. अविनाश सिडाम, कु. माधुरी परसे, श्री. निलेश राठोड, श्री. विनायक गेडाम, कु. कोमल मेश्राम, श्री. सुधीर पिंपळशेंडे, श्री. प्रवीण पहाणपटे व श्री. रामकृष्ण बोरकर यांच्यासह अधिकारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि आंदोलन शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नऊ मागण्या

१. १०:२०:३० सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना सातव्या वेतन आयोगानुसार लागू करावी.२. अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू करावा.३. पात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.४. रिक्त शिक्षकेतर पदे भरण्यास तात्काळ मंजुरी द्यावी.५. सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीनुसार सातवा वेतन आयोग लागू करावा.६. गोंडवाना विद्यापीठासाठी स्वतंत्र सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय स्थापन करावे.७. प्रयोगशाळा परिचरांना कालबद्ध पदोन्नतीनंतर ४०००-६००० वेतनश्रेणी लागू करावी.८. विनाअनुदानित शाखेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा अनुदानित शाखेत ग्राह्य धरावी.९. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करावे.

यावेळी श्री. सतीश पडोळे यांनी ठाम भूमिका मांडताना सांगितले की, संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, समता आणि हक्कांची हमी दिली आहे. त्याच संविधान दिनी आपल्या न्याय्य सेवाविषयक हक्कांसाठी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन करावे लागत आहे, ही बाब शासनाने गांभीर्याने घ्यावी. पहिल्या टप्प्यात धडक मोर्चा, दुसऱ्या टप्प्यात लेखणी बंद आणि आता तिसऱ्या टप्प्यात राज्यव्यापी काम बंद आंदोलन करूनही शासनाने मागण्यांची दखल घेतली नाही, तर यापुढे बेमुदत काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी. गोंडवाना विद्यापीठातील कर्मचारी व अधिकारी संघटना एकजुटीने या आंदोलनात सहभागी असून २६ नोव्हेंबरचे आंदोलन शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी कटिबद्ध आहेत.

कर्मचाऱ्यांची एकजूट हीच आंदोलनाची ताकद असून, शासनाने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.