आदिवासी रूट्स अँड रेसिपी’: मियाम चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार; आलापल्लीत पारंपरिक खाद्यपदार्थांच्या प्रदर्शनाला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद.

0
2

आल्लापल्ली ,गडचिरोली:

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘मियाम चॅरिटेबल TRUST’ने ठोस पाऊल उचलले आहे. ट्रस्टच्या सर्वेसर्वा नितू जोशी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या ‘आदिवासिया – रूट्स अँड रेसिपी’ (Adivasiya Roots & Recipes) या उपक्रमांतर्गत शेकडो आदिवासी महिलांना पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

​आलापल्ली येथील क्रीडा संकुलात असलेल्या गणेशोत्सवातील भव्य मैदानात ‘रेसिपी प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये आदिवासी भागातील पारंपरिक आणि पौष्टिक खाद्यपदार्थांची ओळख शहरी बाजारपेठेशी करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनात महिलांनी बनवलेल्या विविध पारंपरिक पदार्थांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

​या प्रदर्शनात आदिवासी भागातील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ, लाडू, चिवडा, चकली, शंकरपारे आणि विविध स्थानिक मसाले यांचा समावेश आहे. शुद्ध आणि घरगुती पारंपरिक मसाल्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या या पदार्थांना सध्या मोठी मागणी आहे. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि बाजारपेठेच्या अभावामुळे हा समृद्ध वारसा मर्यादित राहिला होता. मियाम चॅरिटेबल ट्रस्टने या महिलांना केवळ पदार्थ बनवण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षणच दिले नाही, तर पॅकेजिंग, स्वच्छता आणि विक्री व्यवस्थापनाचे धडे देऊन त्यांच्यासाठी शाश्वत उपजीविकेचा मार्ग खुला केला आहे.

​”दुर्गम भागातील महिलांमध्ये प्रचंड कौशल्य आणि मेहनत करण्याची तयारी आहे; गरज आहे ती केवळ त्यांना योग्य दिशा आणि संधी देण्याची,” असा विश्वास ट्रस्टच्या सर्वेसर्वा नितू जोशी यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे आज शेकडो महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असून त्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार लागत आहे. मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून भरभरून कौतुक केले जात आहे.