मयताच्या जखमांवरून डावखुरा आरोपी ओळखला; घोट हद्दीतील गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा उलगडा

0
1

गडचिरोली / चामोर्शी:
कोणताही प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नसताना केवळ तपासातील बारकावे, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी घोट पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत घडलेल्या क्लिष्ट खुनाचा यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणी आरोपी संदीप रावजी टेकाम (वय ३५, रा. नारायणपूर चक नं. २) याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
काय आहे घटना?
दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी नारायणपूर येथील गोपीकाबाई रामचंद्र गायकवाड (वय ६०) या शेतात गेल्या असता सायंकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत. नातेवाईक व ग्रामस्थांनी शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत शेतात आढळून आला. याप्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
कोणताही पुरावा नसलेल्या या गुन्ह्याचा तपास गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश व अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरडे यांच्याकडे सोपवण्यात आला. श्री. हिरडे यांनी मृतदेहावरील जखमांचे सूक्ष्म निरीक्षण केले. जखमांच्या स्वरूपावरून हा खून एखाद्या ‘डावखुऱ्या’ (Left-handed) व्यक्तीने केला असावा, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष त्यांनी काढला.
या नव्या दिशेने तपास करत पोलिसांनी कौटुंबिक संबंध, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित संदीप टेकाम याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने जुन्या वैमनस्यातून काठीने मारहाण करून व दगडाने ठेचून गोपीकाबाईंचा खून केल्याची कबुली दिली.
४ दिवसांची पोलीस कोठडी:
आरोपी संदीप टेकाम याला २९ सप्टेंबर रोजी अटक करून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी चामोर्शी यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस पथकाचे कौतुक: सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकुल राज जी. व सपोअ श्री. अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, सपोनि. आगलावे, पोमकें घोटचे सपोनि. कल्पेश खारोडे, सपोनि. गवळी, पोउपनि. विश्वा कराळे आणि अंमलदारांनी पार पाडली. क्लिष्ट गुन्ह्याची उकल करणाऱ्या या पथकाचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले आहे