गडचिरोली / चामोर्शी:
व्यक्तिचा मोठेपणा त्यांच्या पदात नसून संकटात त्यांनी दाखवलेल्या माणुसकीत असतो, याचाच प्रत्यय नुकताच चामोर्शी मार्गावर आला. लॉयड्स मेटल्सचे (Lloyds Metals) बलराम उर्फ भोलू सोमनानी यांनी अत्यंत महत्त्वाचे काम आणि बैठक सोडून एका अपघातग्रस्त अनोळखी व्यक्तीचे प्राण वाचवत समाजासमोर माणुसकीचे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोलू सोमनानी हे गडचिरोली येथून चामोर्शी येथे एका अतिशय महत्त्वाच्या बैठकीसाठी जात होते. वेळ कमी असल्यामुळे आणि बैठकीचे नियोजन महत्त्वाचे असल्याने प्रवास घाईत सुरू होता. मात्र, कुनघाडा गावालगत पोहोचताच रस्त्याच्या कडेला एका अनोळखी व्यक्तीचा गंभीर अपघात झाल्याचे आणि तो गेल्या एका तासापासून मदतीविना पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्याच वेळी त्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक होती त्यामुळे वेळेची घाई आणि स्वतःची मोठी जबाबदारी होती. परंतु, स्वतःच्या कामापेक्षा एका व्यक्तीचा जीव वाचवणे अधिक गरजेचे आहे हे ओळखून सोमनानी यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली गाडी थांबवली. स्वतःची महत्त्वाची कामे बाजूला ठेवत त्यांनी अपघातग्रस्ताला तातडीने मदत मिळवून देण्यासाठी स्वतःची गाडी उपलब्ध करून दिली आणि त्याला सुरक्षितपणे वैद्यकीय उपचारासाठी रवाना केले.
आजच्या धकाधकीच्या युगात पद, प्रतिष्ठा आणि पैशांपेक्षा ‘माणुसकी हीच खरी श्रीमंती आहे’ हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. ऐन मोक्याच्या वेळी स्वतःचा विचार न करता एखाद्याच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची ही कृती केवळ कौतुकास्पद नसून संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. त्यांच्या या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक केले जात आहे.




