अहेरी :
आलापल्ली ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीला आणि सेवनाला तातडीने आळा घालून कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गडचिरोली जिल्हा प्रमुख दिलीप सुरपाम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतचे निवेदनआल्लापल्ली ग्रामविकास अधिकारी, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहे. आलापल्ली परिसरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यासह गावातील शांतता व सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. दारूच्या सेवनामुळे वादविवाद, मारामारी आणि कौटुंबिक कलहाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. विशेषतः अल्पवयीन मुले व शालेय विद्यार्थी व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्याने युवा पिढीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांचा तसेच दारूच्या पुरवठ्याच्या स्रोतांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुरपाम यांनी केली आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास आलापल्ली येथे त्यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.




