स्थानिक ट्रक वाहतूकदारांच्या मागण्यांसाठी १ ऑक्टोबरपासून आष्टीत शांततामय उपोषणाचा इशारा.

0
1

गडचिरोली:

आलापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशन, जि. गडचिरोलीच्या वतीने स्थानिक ट्रक मालक, ट्रान्सपोर्टर तसेच स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. कंपनीकडून स्थानिक ट्रक वाहतूकदारांना कामात प्राधान्य न देता बाहेरील जिल्ह्यांतील तसेच बाहेरील राज्यांतील वाहनधारकांना काम दिले जात असल्याचा आरोप संघटनेने केलेला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आष्टी येथील आंबेडकर चौकात शांततामय उपोषण व आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.आलापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने चामोर्शी येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेड तसेच त्रिवेणी अर्थ मूवर्स प्रा. लि. या कंपन्यांच्या कामकाजासंदर्भात स्थानिक ट्रक मालक व युवकांच्या विविध मागण्या असून, त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी संघटनेने केली.संघटनेच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या काळात कंपनीच्या कामासाठी स्थानिक ट्रान्सपोर्टरांना मालवाहतूक ट्रक घेण्यास प्रोत्साहित करण्यात आले. त्यानुसार अनेक स्थानिक ट्रक मालकांनी कर्ज काढून वाहने खरेदी केली. मात्र, त्यानंतर स्थानिक ट्रक मालकांना अपेक्षित प्रमाणात वाहतुकीचे काम मिळत नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. वाहनांचे कर्ज, देखभाल खर्च, चालकांचे वेतन आणि इतर खर्च भागविणे कठीण होत असल्याचे संघटनेने सांगितले.

बाहेरील वाहनांना काम देण्याचा आरोप

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक ट्रक मालकांना वाहतुकीच्या कामात प्राधान्य देण्याऐवजी बाहेरील जिल्ह्यांतील व बाहेरील राज्यांतील वाहनांना काम दिले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे स्थानिक ट्रक मालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असून, कर्जबाजारी झालेल्या वाहनधारकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी गेले असता समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा तसेच उडवाउडवीची व उद्धटपणाची भाषा वापरली जात असल्याचा आरोपही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या सर्व प्रश्नांवर कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक ट्रान्सपोर्टरांच्या समस्या गांभीर्याने घेऊन सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.

स्थानिक युवकांना रोजगाराची मागणी

गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना कंपनीच्या विविध कामांमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही संघटनेने केली आहे. स्थानिक संसाधने आणि मनुष्यबळाचा वापर करताना स्थानिकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.स्थानिक ट्रक मालकांच्या वाहतुकीसंदर्भातील मागण्या, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच इतर स्थानिक प्रश्नांवर कंपनीने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.१ ऑक्टोबरला आष्टीत उपोषणमागण्यांबाबत कंपनीसोबत दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी चर्चा झाल्यानंतरही समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे ,दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आष्टी येथील आंबेडकर चौकात शांततामय उपोषण व आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले.शिवाय मागण्या लेखी स्वरूपात मान्य न झाल्यास कंपनीतून येणाऱ्या मालवाहू गाड्यांची वाहतूक सेवा पूर्णतः बंद करण्याचा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला. त्यामुळे आगामी काळात कंपनी व्यवस्थापन आणि स्थानिक ट्रान्सपोर्टर यांच्यातील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची ग्वाही

दरम्यान, प्रस्तावित आंदोलन पूर्णपणे शांततामय आणि कायदेशीर मार्गाने करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. प्रशासन व पोलीस विभागाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करण्यात येईल, अशी ग्वाहीही संघटनेच्या वतीने देण्यात आली.जोपर्यंत मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत, तोपर्यंत लोकशाही व शांततामय मार्गाने उपोषण आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका संघटनेने जाहीर केली आहे.पत्रकार परिषदेला पदाधिकाऱ्यांची उपस्थितीयावेळी संघटनेचे अध्यक्ष मल्ला रेड्डी एमनुरवार, उपाध्यक्ष मधुकरभाऊ चिंतलवार, सचिव गणेश दासरवार, कोषाध्यक्ष गितेश अन्ना यांच्यासह किशोर रापल्लीवार, संतोष यबंडवार, जमीर शेख, निर्मल मंडल, धीरज पाल, अमित मुजुमदार, अमोल पवार, मोहीम खान, विजय अधिकारी, लिंगाजी गंधम आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.एकंदरीत स्थानिक ट्रक मालक व युवकांच्या प्रश्नांवर कंपनी व्यवस्थापनाने तातडीने सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. आता १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस विभाग आणि कंपनी व्यवस्थापन कोणती भूमिका घेते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.