आल्लापल्ली:
‘आल्लापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ’ आयोजित ३० यार्ड क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या रोमांचक स्पर्धेत मनोज धुर्वे यांच्या नेतृत्वाखालील ‘फॉरेस्ट टायगर्स आल्लापल्ली’ संघाने अंतिम सामन्यात ‘लाडका राजा क्रिकेट संघा’वर ४ विकेट्सने मात करत दिमाखदार विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर फॉरेस्ट टायगर्स संघाने केवळ मैदानावरच उत्कृष्ट खेळ दाखवला नाही, तर मैदानाबाहेरही औदार्य आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. विजयानंतर मिळालेली पारितोषिक रक्कम स्वतः न स्वीकारता, ती संपूर्ण रक्कम ‘आल्लापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळाला’ देणगी स्वरूपात परत केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून संघाने समाजापुढे एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.
कर्णधार मनोज धुर्वे यांचा क्रीडाप्रवास:
या विजयी संघाचा कर्णधार मनोज धुर्वे हा सध्या गडचिरोली पोलीस दलात कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून हालअपेष्टा सहन करून त्याने गडचिरोली पोलीस दलात नौकरी प्राप्त केली.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तो एक उत्तम मैदानी खेळाडू म्हणून ओळखला जात होता. त्याने राज्य, विभाग आणि विद्यापीठ स्तरावरील विविध मैदानी क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवून आल्लापल्ली परिसर व आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक गाजवला आहे.
केवळ मैदानी खेळातच नव्हे, तर क्रिकेटमध्येही तो सलामीचा तडाखेबाज फलंदाज म्हणून प्रसिद्ध असून अनेक आंतरराज्यीय क्रिकेट स्पर्धा त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने गाजवल्या आहेत. सोबतच मध्यमगती गोलंदाजी करत तो संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देतो. त्यांच्याच नेतृत्वाखाली फॉरेस्ट टायगर्स संघाने या स्पर्धेत हे यश संपादन केले.
गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम: आल्लापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळाद्वारे गणेशोत्सवाच्या १० दिवसांत अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते. यात सलग १० दिवस महाप्रसाद, मॅरेथॉन स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, तसेच कर्करोग (कॅन्सर) आणि नेत्र तपासणी शिबीर यांसारख्या आरोग्यदायी व सामाजिक उपक्रमांचा समावेश असतो. मंडळाच्या या कार्याला हातभार लावण्यासाठीच फॉरेस्ट टायगर्स संघाने आपल्या बक्षीसाची रक्कम देणगी म्हणून सुपूर्द केली.
या शानदार विजयामुळे आणि दाखवलेल्या औदार्यामुळे कर्णधार मनोज धुर्वे व त्यांच्या संपूर्ण ‘फॉरेस्ट टायगर्स’ संघावर क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.




