आलापल्लीत वन्यजीव तस्करांवर मोठी कारवाई; २ खवले मांजर आणि संशयित वाघाची हाडे जप्त, ६ आरोपींना वनकोठडी

0
1
Oplus_16908288

अहेरी:
आलापल्ली वनविभागांतर्गत येणाऱ्या झिमेला उपक्षेत्रातील आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमाता मंदिर परिसरात वनविभागाने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत २ जिवंत खवले मांजरांसह वाघाची हाडे असल्याच्या संशयावरून मोठा साठा जप्त करण्यात आला असून, एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे आलापल्ली वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी, महसूल गुप्तवार्ता संचालनालय (DRI), वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो (WCCB) आणि छत्तीसगड येथील उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाने संयुक्तपणे नागमाता मंदिर परिसरात सापळा रचला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून संशयित तस्करांशी संपर्क साधला. २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास ५ आरोपी वन्यजीवांची बेकायदेशीर खरेदी-विक्री करण्यासाठी आले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर मिळालेल्या अधिक माहितीवरून आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.जप्त केलेला मुद्देमाल:तस्करांच्या ताब्यातून खालील वन्यजीव आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे१ जिवंत प्रौढ खवले मांजर,
१ जिवंत खवले मांजराचे पिल्लू (Schedule – I)
वाघाचे अवयव असण्याचा संशय असलेले ४३ हाडे व २ दात,इतर तस्करांशी संबंधित साहित्य
१ ऑक्टोबरपर्यंत वनकोठडी
या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ सप्टेंबर रोजी सर्व ६ आरोपींना प्रथमश्रेणी न्यायालय, अहेरी येथे हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. वन्यजीवांच्या या बेकायदेशीर व्यापाराची साखळी कुठपर्यंत पसरली आहे आणि अवयवांचा मुख्य स्रोत काय आहे, याचा सखोल तपास वनविभाग करत आहे.ही धडक कारवाई उपवनसंरक्षक शैलेश मिना, उपविभागीय वनाधिकारी एस. जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. रामगुंडेवार व वन कर्मचाऱ्यांनी पार पाडली. वन्यजीवांची अवैध शिकार व तस्करी जैवविविधतेसाठी घातक असून अशा तस्करांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वनविभागाने दिला आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.