भामरागडला पुराचा विळखा: १०० हून अधिक गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला; ५२५ नागरिकांचे स्थलांतर, पर्लकोटा नदीला उधाण

0
2

गडचिरोली:

छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. भामरागडलगतच्या पर्लकोटा नदीने रौद्ररूप धारण केल्याने पुराचे पाणी थेट भामरागड शहरात आणि नागरी वस्त्यांमध्ये शिरले आहे. दुपारी अल्लापल्ली-भामरागड मार्गावरील पर्लकोटा नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने भामरागडसह परिसरातील १०० हून अधिक गावांचा जिल्ह्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने काल दुपारपासून राबवलेल्या तातडीच्या बचाव मोहिमेत पूरबाधित ५२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असून सध्या पाणी ओसरू लागल्याने दिलासा मिळत आहे.

घरांमधील साहित्य काढण्यासाठी नागरिकांची धडपड

काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने मुख्य मार्ग बंद झाला. सायंकाळच्या सुमारास पुराची पातळी अधिकच वाढत गेल्याने भामरागड शहरातील सखल भागात पाणी शिरले. अनेक घरांमध्ये पाणी फिरायला लागल्याने घरातील धान्य, कपडे आणि आवश्यक साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ उडाली. स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने उशिरापर्यंत नागरिकांना व त्यांच्या साहित्याला सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम सुरू होते.

प्रशासनाकडून ५२५ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

पूरपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वात महसूल व स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदतकार्य हाती घेतले. काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बचाव मोहिमेत बाधित भागातील ५२५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सध्या पाणी हळूहळू ओसरत असले तरी महसूल कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथक परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

आजारी विद्यार्थिनीसाठी ‘एनडीआरएफ’ ठरले देवदूत

पुराच्या बिकट परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) पथकाने अत्यंत कौतुकास्पद आणि धाडसी कामगिरी बजावली. बिनागोंडा आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका आजारी मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज होती. मात्र, लाहेरी मार्गावरील गुंडेनूर नाला पुराच्या पाण्यामुळे तुडुंब भरून वाहत असल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. अशा वेळी एनडीआरएफच्या जवानांनी देवदूतासारखी धाव घेत, उसळत्या पाण्यातून गुंडेनूर नाला ओलांडून या आजारी विद्यार्थिनीला सुरक्षितपणे लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

वीज आणि मोबाईल सेवा ठप्प; जनजीवन विस्कळीत

भामरागड परिसरातील पर्लकोटा, इंद्रावती आणि पामुलगौतम या नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे संपूर्ण दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक भागात पुराच्या पाण्यामुळे विजेचे खांब आणि टेलिकॉम नेटवर्कला फटका बसल्याने वीजपुरवठा आणि मोबाईल सेवा खंडित झाली आहे. परिणामी, स्थानिक नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.

प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नद्यांचे पाणी हळूहळू ओसरत असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नदीकाठच्या व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी पूर्णपणे सतर्क राहावे. पाणी वाहत असलेल्या पुलांवरून किंवा धोकादायक मार्गांवरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.